पंढरपूर,दि.11- गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला असा जयघोष करीत येथे महाव्दार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारी पूर्ण झाली असे मानले जाते.
येथील हरिदास घराण्यात महाव्दार काला करण्याची परंपरा आहे. मागील अकरा पिढ्या पासून हा सोहळा साजरा केला जातो. या घराण्यातील संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने आपल्या खडावा प्रसाद रूपाने दिल्या अशी अख्यायिका आहे. तेव्हां पासून चारशे वर्षा नंतर ही महाव्दार काल्याची परंपरा कायम आहे. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना यामध्ये मान असतो. नामदास महाराजांची दिंडी आल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो.
दरम्यान परंपरे प्रमाणे हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर श्री विठ्ठलाच्या पादुका शंभर फूट लांब पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडप येथे हा सोहळा दाखल झाला. येथे महाराजांना खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. यानंतर हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल झाला तेथे जल अभिषेक करून कुंभार घाटावरून खाजगीवाले धर्मशाळेत दही फोडल्यानंतर आराध्ये गल्ली, हरिदास वेस मार्गे काल्याच्या वाड्यात दाखल झाला.
यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसह स्थानिक दुकानदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणत कुंकू, बुक्का, गुलाल, लाह्या उधळण्यात येत होत्या. काल्याच्या वाड्यात सोहळा दाखल झाल्यानंतर दहा पोती लाह्यांचा काला करून भाविकांना वाटण्यात आला. या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.
0 Comments