पंढरपूरः 'बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष कालावधी असलेल्या बी.ए.एल.एल.बी. (विधी) प्रवेशासाठी गुरुवार, दि.२६ जून २०२५ पासून तर पदवी नंतर तीन वर्ष कालावधी असलेल्या एल. एल. बी. (विधी) च्या प्रवेशासाठी सोमवार, दि.३० जून २०२५ पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया गुरुवार, दि. १० जुलै २०२५ पर्यंत करता होती परंतु या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे मिळाली नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थी हे नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्य्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून तीन वर्ष व पाच वर्ष कालावधी असलेल्या विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून आता शुक्रवार, दि. १८ जुलै २०२५ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून केवळ पैसा आणि वेळ यांचा व्यवस्थित समन्वय साधता न आल्याने शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही व्यावसायिक शिक्षण घेता येत नव्हते हे पाहून स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले आणि १९९८ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) च्या माळरानावर तंत्रशिक्षण संस्था काढली, परिश्रम करत संस्था व्यवस्थित टिकवून ठेवली, त्यात सातत्य राखले. त्यामुळे स्वेरीला शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळत राहिले. वाढत्या यशामुळे पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांची अपेक्षा वाढली. स्वेरीमध्ये पुढे डिप्लोमा, फार्मसी, एम. बी. ए. एम.सी.ए., पी.एचडी. हे अभ्यासक्रम देखील नागरिकांच्या अपेक्षेनुसार वाढविले. त्यांनाही आता अभूतपूर्व यश मिळत आहे. हे पाहून नागरिकांची अपेक्षा आणखी वाढली आणि पालकांच्या मागणीनुसार विधी (एल.एल.बी.) शिक्षण सुरू करण्याचे ठरविले. स्वेरीतील विधी शिक्षणाचे यंदाचे हे पहिलेच वर्ष असून त्याला शासनाकडून आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाची देखील मान्यता मिळाली आहे. त्यामुळे स्वेरी कॅम्पस मध्ये असलेल्या नव्या इमारतीत हे शिक्षण यंदापासून सुरु होत आहे. शिक्षणासाठी पोषक असलेल्या वातावरणात विधी शिक्षण सुरु होत असल्यामुळे पंढरपूर पंचक्रोशीत भावी वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने एल.एल.बी. (तीन वर्ष व पाच वर्षे ) प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून सुधारित वेळापत्रकानुसार आता शुक्रवार, दि. १८ जुलै २०२५ वाजेपर्यंत ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालणार आहे. तसेच कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी व निश्चिती (ई-स्क्रुटीनी) करण्यासाठी मंगळवार, दि. ०१ जुलै २०२५ पासून ते मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच ‘एमएएच- एलएलबी सीईटी २०२५' ही परीक्षा दिलेली असावी. असे पात्र विद्यार्थी एल.एल.बी. मध्ये प्रवेश घेऊ शकतात. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध आहे. एल.एल.बी.च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील (मोबा.नंबर–९५९५९२११५४) व प्रा. स्वप्नाली गडदवार (मोबा.नं.-९३७३०२३०९७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments