औषधनिर्मिती प्रक्रियेवर झाला सखोल संवाद
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्राध्यापिकांनी दि.०८ जुलै २०२५ रोजी कोल्हापूरच्या एस.जी. फायटो फार्मा या औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित उद्योग व्यवसायाचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्यामधून विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीचे शिक्षण देताना त्यांनी घ्यावयाची काळजी, औषधांची गुणवत्ता काय असावी आदी बाबत जाणून घेतले.
कोल्हापूर मधील एस.जी. फायटो फार्मा हे औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य नाव असून या कंपनीने हर्बल आणि आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रात एक विश्वासार्हता कमावलेली आहे. सन १९९९ मध्ये ही संस्था स्थापन झालेली असून ही कंपनी जी.एम.पी. (गुड मॅनिफॅक्चरिंग प्रॅक्टीसेस) प्रमाणित असून विविध हर्बल औषधांचे उत्पादन आणि निर्यात करते. १०० टक्के हर्बल आणि नैसर्गिक घटकांवर आधारित उत्पादन, उत्पादन प्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांद्वारे आणि गुणवत्ता नियंत्रण पद्धतींनुसार केली जाते, कंपनी कॅप्सूल्स, टॅब्लेट्स, सिरप्स, ऑइंटमेंट्स, आणि चूर्णे अशा विविध स्वरूपात उत्पादने तयार करते अशी ती एक निर्यातक्षम कंपनी आहे. त्यामुळे अनेक हर्बल उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले जातात. या उद्योगभेटीचा उद्देश हा होता की, औद्योगिक प्रक्रिया समजून घेणे, उत्पादनातील व्यावहारिक पैलूंवर सखोल माहिती मिळवणे व महाविद्यालय व उद्योग यांच्यातील सहकार्य वृद्धिंगत करणे. यावेळी एस.जी. फायटो फार्मा मधील क्वालिटी कंट्रोलच्या विभागप्रमुख सौ. प्राजक्ता पी. देशपांडे यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला. त्यांनी गुणवत्ताविषयक प्रक्रिया, कार्यप्रणाली आणि उच्च दर्जा राखण्याचे महत्त्व या बाबी सविस्तर सांगितल्या. कंपनीचे व्यवस्थापक दीपक गुणे यांनी औषधनिर्मिती प्रक्रियेतील विविध टप्पे, गुणवत्ता नियंत्रणाची अंमलबजावणी, आणि विविध विभागांमधील समन्वय आणि उत्पादन कार्यप्रणालीची सविस्तर माहिती सांगून औषधी उत्पादनातील नाविन्यपूर्ण बाबी सांगितल्या. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उद्योगभेटीत डॉ.प्राजक्ता खुळे, प्रा. लताताई पाटील, प्रा. कोमल परचंडे, प्रा. सुप्रज्ञा गायकवाड आणि प्रा. प्रणीता शिंदे यांनी सहभाग घेतला होता. भेटीच्या माध्यमातून झालेल्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना औद्योगिक भेटींचे काय महत्व आहे हे पटवून देता येईल. केवळ अभ्यासी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कंपन्यांना भेट दवून तेथील पाहणी व अभ्यास करून अधिक ज्ञान मिळते, हे समजून येते.
0 Comments