बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटी सदस्या व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात बक्सर, भोजपूर, कैमूर, रोहतास, औरंगाबाद, गया, नवादा, नालंदा, जमुई, शेखपुरा, पटना, पटना टाऊन व जहानाबाद या जिल्ह्यांतील काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी प्रभारी सचिव देवेंद्र यादव उपस्थित होते.
मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी आपले परिचयपत्र, कार्याचा अहवाल सादर करून उमेदवारीची मागणी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा, राजकारणातील अनुभव, जनसंपर्क, पक्षकार्यातील सक्रियता तसेच मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबत उमेदवारांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “बिहारच्या भूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘वोटर अधिकार यात्रेला’ लाखो युवक, शेतकरी आणि महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या जनआंदोलनामुळे भाजप-जेडीयूच्या सत्तेला गंभीर आव्हान निर्माण झाले असून बिहारमध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे. यात्रेदरम्यान तसेच उमेदवारांच्या मुलाखतीत प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. जनतेचा प्रतिसाद पाहता हे स्पष्ट आहे की बिहारची जनता बदलाच्या तयारीत आहे आणि यावेळी काँग्रेस-INDIA आघाडीला निश्चितच सत्ता देणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही आंधी म्हणजे लोकशाही वाचविण्याची लढाई असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून जनतेच्या हक्कासाठी लढणे गरजेचे आहे.”
या बैठकीस बिहार प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काही दिवसांत उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेतला जाणार असून, बिहार निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे सज्ज असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments