पंढरपूर दि.30:- दिनांक 29 जानेवारी, 2026 रोजी माघ एकादशी असून, या यात्रेला येणा-या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मंदिर समितीची सभा दिनांक 30 डिसेंबर रोजी दु.12.00 वाजता श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस शकुंतला नडगिरे डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्व विभागाचे सहा. संचालक डॉ. विलास वाहणे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे एस. विनोदकुमार, जतन – संवर्धन कामाचे ठेकेदार, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
या सभेमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना पुरातत्व विभागास देण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या मुर्ती संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना भारतीय पुरातन विभागाने दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असून, या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, मंदिर समिती सदस्य, सल्लागार परिषद सदस्य, स्थानिक महाराज मंडळी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालानुसार श्रींच्या मूर्ती संवर्धनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
याशिवाय, मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर श्री विठ्ठलाची नित्यपुजा उपलब्ध करून देणे, उपदान लागू करणे, श्रीक्षेत्र आळंदी येथे जागा खरेदी करणे, भेट स्वरूपातील दाग-दागिन्यांचे मुल्यांकन करणे, जमिनी Joint Venture म्हणून 3 वर्षासाठी भाडे तत्वावर देणे इत्यादी निर्णय घेऊन, टोकन दर्शन प्रणालीचा आढावा घेण्यात आला असून, त्याची दैनंदिन संख्या 1200 वरून 1800 करण्यात आली. याशिवाय, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल व पृथ्वीराज राऊत यांनी मागील चार महिने चांगल्या पध्दतीने व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळल्या बद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे कर्मचारी अंबादास गजाकोष व श्री बसवगोपाल नीलमाणिक मठाच्या दासोहरण चक्रवर्ती अन्नदानेश्वर महाराज उर्फ आप्पाजी यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. अन्नदानेश्वर महाराज यांचेकडून दरवर्षी आषाढी यात्रेत पत्राशेड येथे मोफत अन्नदान करण्यात येते.
मंदिर जतन व संवर्धन कामास गती देऊन विहित वेळेत गुणवत्ता पूर्ण कामे करण्याच्या दृष्टीने तसेच माघ यात्रा 2026 मध्ये भाविकांना चांगल्या सोई सुविधा देणे व दर्शनरांगेचे सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यासाठी मंदिर समितीच्या सभेत सांगोपांग चर्चा करण्यात आली. याशिवाय, श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासनाने मंजुरी दिली असून, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयाने तसेच सर्वांशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगीतले.
चौकट
श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथील फ विंगच्या इमारतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सीएसआर फंडातून विद्युत व्यवस्थेसाठी 125 केव्हीचा सोलर प्लांट उभारण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ देखील मंदिर समितीचे सह अध्यक्ष व सदस्य महोदयांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे विद्युत व्यवस्थेच्या खर्चामध्ये 1 ते 1.5 लक्ष रुपयाची बचत होणार आहे.
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.

0 Comments