पंढरपूर- पुण्यातील सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एसआयटी) मध्ये दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘आयआयसी प्रादेशिक मेळावा २०२५’ चे आयोजन केले होते. त्यात गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे स्वेरीच्या स्टाफचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘आयआयसी प्रादेशिक मेळावा २०२५’ मध्ये स्वेरीला ‘बेस्ट आयआयसी पोस्टर पुरस्कार’ आणि 'बेस्ट इनोव्हेशन अम्बॅसेडर (आयए) पुरस्कार’ असा दुहेरी मान मिळाला आहे. हे दोन्ही पुरस्कार प्रतिष्ठेचे असल्यामुळे स्वेरीला प्रादेशिक स्तरावर विशेष गौरव प्राप्त झाला आहे. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी स्वेरीतील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) च्या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची साक्ष देणारी आहे. शिक्षण मंत्रालयाच्या ‘इनोव्हेशन सेल’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयआयसी अंतर्गत नवोन्मेष जागृती कार्यक्रम, कल्पनासर्जन (आयडीएशन) कार्यशाळा, बौद्धिक संपदा (आयपी) विषयक मार्गदर्शन, स्टार्ट-अप व इन्क्युबेशन केंद्र भेटी, तज्ज्ञ व्याख्याने, इनोव्हेशन स्पर्धा तसेच मेंटर-मेंटी उपक्रम यांचे नियमित आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक व ठोस परिणाम दिसून येत असून विद्यार्थ्यांचा नवोन्मेष उपक्रमांतील सहभाग वाढला आहे. विद्यार्थ्यांकडून प्रकल्प व प्रोटोटाइप विकसित करणे, बौद्धिक संपदा नोंदणी, विविध नवोन्मेष स्पर्धांमध्ये सहभाग तसेच उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०’ च्या उद्दिष्टांनुसार समाजोपयोगी व शाश्वत उपाययोजनांवर आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. ‘बेस्ट आयआयसी पोस्टर पुरस्कार’ हा महाविद्यालयाच्या नवोन्मेष प्रवासाचे प्रभावी सादरीकरण, उपक्रमांची सुस्पष्ट मांडणी व मिळवलेल्या यशाची दखल घेऊन प्रदान करण्यात आला, तर ‘बेस्ट इनोव्हेशन अॅम्बेसडर पुरस्कार’ हा विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष संस्कृती रुजवण्यासाठी केलेल्या नेतृत्वपूर्ण व सातत्यपूर्ण योगदानासाठी प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नवोन्मेष, संशोधन व उद्योजकता क्षेत्रातील वचनबद्धतेची पुनःपुष्टी करतात आणि भविष्यात अधिक प्रभावी, विद्यार्थी-केंद्रित नवोन्मेष उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा देतात. या ‘आयआयसी प्रादेशिक मेळावा २०२५’ मध्ये उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्धल डॉ. दिग्विजय रोंगे यांना सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिक्षण उपसंचालिका डॉ. दिपाली व्होरा यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व पालकांनी प्रा. दिग्विजय रोंगे यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments