पंढरपूर : दिनांक, २५ एप्रिल २०२६
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके संवर्धन’ या योजनेअंतर्गत फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील प्राचीन अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १ कोटी ८५ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांची कार्यान्वयीन यंत्रणा सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तसेच गावातील ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
मंजूर कामांमध्ये मंदिर परिसरातील संपूर्ण मंदिरांची पुनर्बांधणी, झाडे-झुडपे काढणे, साफसफाई करणे, दगडी भिंती स्वच्छ करणे, खराब झालेले दगड बदलणे, कर्णशिला काम, दर्जा भरणे तसेच इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे.
फुलचिंचोली हे गाव धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असून येथील अंबाबाई मंदिर हे स्थानिकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर १२ ते १३ व्या शतकातील हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले असून मजबूत दगडी रचना आणि साधेपणा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. मंदिरात गर्भगृह, भक्तांसाठी सभामंडप तसेच परिसरात दीपमाळ आणि उपमंदिरे आढळतात.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. आई अंबाबाई आणि जनतेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच शेतकरी व सर्वसामान्य जनतेला सुख-समृद्धी लाभावी, अशी कामना व्यक्त केली. फुलचिंचोली ग्रामस्थांच्या मागणीनुसार मंदिर परिसराचा विकास होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
याचवेळी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. साधुसंत आणि भगवंताचे आशीर्वाद घेऊन आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या निर्णयामुळे मंदिराच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार असून भाविक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धार्मिक कार्यास गती मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते कल्याणराव बप्पा पाटील, सरपंच नारायण जाधव, तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, दादासाहेब प्रक्षाळे, रमाकांत पाटील, मारुती वाघ, गौतम प्रक्षाळे, शंकर गायकवाड, अर्जुन म्हेत्रे, अण्णासो परांडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments