LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १८ व्या दीक्षांत समारंभात कु. अंकिता सिलगानी यांना M.B.B.S. पदवी प्रदान*



अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून डॉ. अंकिता ललिता भूमय्या सिलगानी हिचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिने M.B.B.S. पदवी यशस्वीरित्या संपादन केली. कार्निवल रिसॉर्ट, लातूर येथे पार पडलेल्या १८ व्या दीक्षांत समारंभात तिचा गौरव करण्यात आला.

या समारंभाला तिरुपती परकीपंडला, तिचे वडील भूमय्या सिलगानी, आई सौ. ललिता सिलगानी तसेच भाऊ राहुल सिलगानी उपस्थित होते.

डॉ. अंकिता यांच्या यशामागे तिच्या आई-वडिलांची अथक मेहनत, त्याग आणि मुलांना शिक्षण देण्याची जिद्द ठळकपणे दिसून येते.

डॉ. अंकिता यांचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद प्रशालेत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण वालचंद कॉलेजमध्ये झाले. 

अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या अंकिताने आपल्या घरची परिस्थिती आणि आई-वडिलांचे कष्ट यांची जाणीव ठेवत रात्रंदिवस अभ्यास करून हे यश संपादन केले.
तिची आई ललिता सिलगानी या विडी कामगार म्हणून कष्ट करतात, तर वडील भूमय्या सिलगानी हे यंत्रमागावर मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. “आपल्या मुलांनी शिकले पाहिजे आणि त्यांना आपल्या सारखे कष्टमय जीवन जगावे लागू नये” या ठाम विचारातून त्यांनी मुलांना शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांच्या या जिद्दीचे फळ म्हणजे मुलगी अंकिता डॉक्टर झाली, तर मुलगा राहुल सिलगानी हा देखील इंजिनिअर बनला आहे.

अंकिता यांनी खडतर मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले असून “डॉक्टर” ही केवळ पदवी नसून ती एक मोठी जबाबदारी आणि विश्वासार्हता असल्याची जाणीव तिने जपली आहे. पुढील काळात उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात अधिक योगदान देण्याची तिची इच्छा आहे. यासाठी आजपर्यंत सहकार्य केलेल्या सर्वांचे आभारही व्यक्त केले.

अंकिता यांच्या या यशामुळे सिलगानी कुटुंबाचा दीर्घ संघर्ष आणि कष्ट आज सार्थ ठरले आहेत. तिची ही यशोगाथा समाजातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

तिच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी, उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तिच्या आयुष्यातील हे यश समृद्धी आणि नव्या संधींची पहाट घेऊन येवो, हीच सदिच्छा.

Post a Comment

0 Comments