LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुर शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी - प्रांताधिकारी सचिन इथापे



        पंढरपूर (दि,22):- अधिकमास निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपूरात येतात. शहरातील वाहतुक कोंडीमुळे नागरिकांना  तसेच येणाऱ्या भाविकांना रहदारीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी  अवजड वाहने बाह्यवळणाने जातील याची दक्षता घेवून, शहरातील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सुचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
         अधिकमास निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस  सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, मंदीर समितीचे कार्यकारी  अधिकारी राजेंद्र शेळके,  मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, टी.वाय. मुजावर, मंदीर समितीचे व्यवस्थापक  प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
         यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले,  अधिकमास निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेवून, भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त नेमावा. शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत. मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग येथील अतिक्रमण  मोहिम सुरु ठेवावी. वाळवंटात फिरते विक्रेते, वाहने प्रवेश करणार नाहीत याची दक्षता घेवून आवश्यक उपाय योजना कराव्यात. शहरातील  अनाधिकृत होर्डींग तात्काळ काढावेत तसेच  आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय होर्डींग तात्काळ काढावेत अशा सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.
           यावेळी सहा. पोलीस  अधिक्षक प्रशांत डगळे म्हणाले,  अधिकमास निमित्त दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेवून भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. तसेच भाविकांना फिरते विक्रेत्यांचा व अतिक्रमणाचा त्रास होऊ नये यासाठी शहरात नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
           अधिकमास कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदीर समिती मार्फत आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, भाविकांना दर्शन रांग, दर्शन मंडप येथे मॅट,पिण्याचे पाणी, विश्रांती कक्ष, शौचालय, स्वच्छता, वैद्यकीय उपचार आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन प्राधान्य दिले असून, दर्शनरांगेत घुसखोरी होऊ यासाठी  जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. भाविकांसाठी दर्शनरांगेत स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. तसेच भाविकांच्या सुविधेसाठी स्वंयसेवक, कंत्राटी कर्मचारी,  मंदीर समिती कर्मचारी अशा एकूण 1200 कर्मचारी व स्वयंसेवाची नेमणूक केली असल्याचे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी  सांगितले. 
        यावेळी अधिकमास कालावधीत पंढरपूर नगर पालिका प्रशासनाकडून आरोग्य, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा,  अतिक्रमण मोहिम आदी बाबतची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावेळी दिली.   
                                                                 ०००००००००

Post a Comment

0 Comments