पंढरपूर (ता.23) – मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रासाठी मुंबई येथील अमर वाटेगांवकर या दानशुर भाविकाने सुमारे एक लाख रूपये किंमतीची जर्मन भांडी भेट दिली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
श्री.वाटेगांवकर हे काही दिवसापूर्वी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अन्नछत्रात भोजन प्रसाद घेतल्यानंतर अन्नछत्रास उपयोगी साहित्य देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी अंदाजे एक लाख रुपये किमतीची जर्मन पातेले व स्टीलचे ग्लास सेवाभाव म्हणून मोफत दिली आहेत. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, उपरणे, दैनंदिनी व दिनदर्शिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी श्री.वाटेगांवकर यांचे कुटुंबिय, बांधकाम विभाग प्रमुख बलभिम पावले, अन्नछत्र विभाग प्रमुख राजेश पिटले, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी व इतर कर्मचारी उपस्थित होते. या भाविकाने दिलेल्या साहित्याचा वापर अन्नछत्र येथे भोजन प्रसाद बनविणे तसेच यात्रा कालावधीत दर्शनरांगेत चहा व खिचडी वाटपावेळी करण्यात येणार आहे.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती मार्फत भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून श्री. संत तुकाराम भवन येथे दैनंदिन दु.12.00 ते 2.00 व रा.07.00 ते 9.00 या वेळेत मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा दैनंदिन 2500 ते 3000 भाविक लाभ घेतात. या अन्नछत्रात अन्नधान्य व इतर साहित्य दान करण्याची देखील सोय आहे. तसेच *अन्नछत्र सहभाग योजना* असून, या योजनेत किमान रू.7,000/- पासून पूढे रक्कम दिल्यास, इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येते.


0 Comments