पंढरपूर– ‘शाळा, कॉलेजेसचे आमंत्रण मी नेहमी स्वीकारते कारण मला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायला आवडते. मी केरळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. शाळेमध्ये असताना माझा प्रथम क्रमांक कधीच नव्हता आणि मी एक सामान्य विद्यार्थिनी होते. पदवीच्या शिक्षणानंतर मी यूपीएससीची तयारी सुरू केली. परीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात तर काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्याच गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे. परीक्षा मधील चुकातून शिकण्याने आपण खऱ्या अर्थाने घडत असतो. अपयश हे कधीही शेवटचे नसते. त्यामुळे परिश्रमात सातत्य ठेवल्यास आपले ध्येय गाठता येते. यासाठी सकारात्मक विचाराने अभ्यास करा आणि हे सर्व शिक्षणाने साध्य होते.’ असे प्रतिपादन त्रिवेंद्रम (केरळ)च्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांनी केले.
स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. ह्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मार्गदर्शन करत होत्या. प्रारंभी डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘शिक्षणाचे सध्याचे महत्व आणि प्रशासकिय यंत्रणेतील योगदान’ याबाबत बोलत असताना पुढे म्हणाल्या की, ‘स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणे हे सहज शक्य नसते. मला देखील यशस्वी होण्यासाठी चार वेळा प्रयत्न करावे लागले. पुन्हा पुन्हा अपयश येत राहिले तर आपल्या मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि अशा काळात बर्याचदा आपल्या कुटुंबातील लोक आणि नातेवाईक ही आपल्याला साथ देत नाहीत. मुलींना तर त्यांच्या शिक्षण आणि करिअर ऐवजी लग्न करून संसारात स्थिर होण्याबाबत सांगितले जाते. अशा वेळी आपण न डगमगता सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असते.’ असे सांगून स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील स्पर्धा परीक्षेबाबत कुतूहलाने अनेक प्रश्न विचारले असता आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांनी सर्वांची समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त आलेले प्रमुख पाहुणे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी, पुणे चे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, किर्लोस्कर कंपनीचे एच.आर. ऋषिकेश कुलकर्णी, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, स्वेरी संचलित अभियांत्रिकी व फार्मसीचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments