पंढरपूर/ तालुका प्रतिनिधी
ऊस तोडणी करुन वाहनांद्वारे पुरवठा करण्याचे करार करून, प्रत्येकी ५ लाख प्रमाणे एकूण १५ लाख रूपये उचल घेऊनही संबंधित यंत्रणा न पुरविता चंद्गभागानगर - भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी ३ ज़णांविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकज़णाला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी (दि.1३) त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
देविदास विठ्ठल तरडे, राणी देविदास तरडे (रा.बज़रंग वस्ती, कचरेवाडी, ता.माळशिरस) व यशवंत बाळासाहेब लवटे (रा.मेडद, ता.माळशिरस) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. सन २०२४-२५ या ऊस गळीत हंगामात 'सहकार शिरोमणी' साखर कारखान्यासाठी मज़ुरांमार्फत ऊस तोडणी करून वाहनांद्वारे पुरवठा करण्याबाबतचे करार यातील तिघांनी केलेले होते. त्यापोटी कारखान्याने त्यांना प्रत्येकी ५ लाख रूपये प्रमाणे एकूण 1५ लाख रूपये निशिगंधा सहकारी बँकेतून अदा केले होते.
प्रत्यक्षात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर यातील तिन्ही वाहन मालक यंत्रणेसह कारखान्याकडे हज़र झाले नाहीत. 'सहकार शिरोमणी'कडे करार करून, पैसे घेऊन ते अन्य कारखान्यांकडे ऊस तोडणी -वाहतूक यंत्रणा घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याबाबतची फिर्याद शेती अधिकारी प्रतापराव थोरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही ठेकेदार पसार झाले होते. अखेर यातील देविदास तरडे याला पोलिसांनी अटक केली असून सोमवारी न्यायालयात हज़र केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा हज़र केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.कारखान्याच्यावतीने ॲड.बी.व्ही. भादुले यांनी काम पाहिले.
--
चौकट :
गेल्या २५ वर्षात 'सहकार शिरोमणी'ने कधीही ऊस वाहतूकदार वाहन मालकांविरूद्ध तक्रार दाखल केली नाही. उलट ज्यांच्या टोळ्या पळून गेल्या, त्यांना कारखान्याने सर्व कायदेशीर मदत केली. येणारा खर्चही भरला. ज्या कारखान्याकडे करार करून पैसे उचललेले असतात, त्याच कारखान्यास ऊस पुरवठा करणे अपेक्षित असतो. परंतु, गत हंगामात कांही ज़णांनी 'सहकार शिरोमणी'कडे करार करून अन्य कारखान्यांना ऊस पुरवठा केला. त्यामुळे कारखान्याचे नुकसान आणि फसवणूक झाली आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत.
-- कल्याणराव काळे, चेअरमन, 'सहकार शिरोमणी' सहकारी साखर कारखाना.
0 Comments