पंढरपूर,( दि.20):- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. वारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची (वारकऱ्यांची) पाण्यासाठी गैरसोय होऊ नये तसेच वारी कालावधीत पाण्याचा तुटवडा भासू नये आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचे सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत प्रांताधिकारी कार्यालय, सांस्कृतीक भवन पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रसन्न भातलवंडे, तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी शनिवार दि. 21 नोव्हेंबर, 2026 रोजी असून, यात्रा कालावधी दि. 10 ते 28 नोव्हें. असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य नियोजन करावे, यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता व पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे, शहरातील अतिक्रमणे कायमस्वरुपी काढण्याबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकाची नेमणूक करावी. पाटबंधारे विभागाने नदीपात्रात पाणी सोडण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. आरोग्य विभागाने मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. भक्ती सागर (65 एकर) येथील जागेची स्वच्छता करुन वीज, पाणी आदी व्यवस्थेची उपलब्धता करावी
यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाबजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने तेथे जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करावी . मंदीर समितीने दर्शन रांगेत घुसघोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अन्न औषध प्रशासन विभागाने खाद्य पदार्थ तसेच प्रसादाच्या दुकानाची वेळोवेळी तपासणी करावी. अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री इथापे यांनी यावेळी दिल्या.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले असून, दर्शन रांगेत घुसघोरी होऊ नये यासाठी जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले. तसेच नगर पालिका प्रशासनाकडून यात्रा शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आवश्य ठिकाणी बॅरेकेटींग, पार्कींग व्यवस्था, वेळोवेळी स्वच्छता याबाबतचे नियोजन केले असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
00000000

0 Comments